येत्या काही दिवसांत गौरी- गणपती, नवदुर्गा यांसह इतरही महत्त्वाचे सण-उत्सव तोंडावर आले आहेत. गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. हे सर्व सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिसांची चमू नियोजन करत आहेत. या सण-उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
अमरावती शहरात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. हजारांच्या वर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येत असते. सर्व शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. या सण-उत्सवाच्या दरम्यान कुणी दंगा, धोपा करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला तुरुंगात टाकण्याच्या सूचनाच देण्यात आल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.सण उत्सवाचा काळ जवळ येण्यापूर्वी समाजकंटकाचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. सर्वच पोलिस ठाणी तशी यादी बनवत आहेत.सध्या जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अनेकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
सराईतांवर कारवाया
विविध गुन्ह्यांमधील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, हद्दपार गुन्हेगार यांच्यासह मटका, जुगार चालवणारे आणि बेकायदेशीरपणे मद्याची विक्री करणायांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जाणार आहेत. पोलिस विभागाकडून अशांची कुंडली गोळा करण्यात येत आहे.