अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणावरुन महिला आयोग आणि भाजप नेत्या चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर कारवाई प्रकरणी महिला आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीला चित्रा वाघ यांनी जाहीर उत्तर दिले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “खुल्या समाजात उघडा नंगानाच, सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार. आपण समाजाचं देणं लागतो, हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनेच असायला हवं.”
“महिला आयोगाचा कायम सन्मान करतो. मी नोटिशीचं उत्तर दिलं आहे. मला नोटीस दिली हे जसं जाहीर सांगितलं. दिलेली नोटीस वितरित केली. तसंच हे उत्तरही सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही. स्वैराचाराला लगाम घालणं, ही फक्त माझीच जबाबदारी नाही तर कायद्यानं स्थापित झालेल्या महिला आयोगाचीही आहेच. माझा लढा सुरूच राहणार,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, महिला आयोगाच्या आम्ही विरोधात नाही. खूप महिलांनी आयोगात काम केले आहे. चित्रा वाघ आयोगावर आता आल्या आहेत. आम्ही आयोगावर काम करुन पुढे आलो आहोत. त्यामुळे आयोग काय काम करते, हे आम्हाला चांगल्याप्रकारे माहित आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास आहे. अशा ५६ नोटीस मला रोज येतात. त्यात विशेष काही नाही.