१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमी युगलांसाठी खास असतो. कारण या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. पण या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारण्याऐवजी गायीला मिठी मारा असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं होत. मंडळानं काढलेलं पत्र व्हायरल झालं. त्यावर देशभरातील लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी विरोध दर्शवला. समाजमाध्यमात मिम्स व्हायरल झाले होते. त्यानंतर पशु कल्याण मंडळानं हा निर्णय मागे घेतला. मात्र चंद्रपुरात काऊ हग डे साजरा झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील एक गोमाता थेट दुकानात जाऊन दुकानदाराची भेट घेत असते. त्याला प्रेमानं गोंजारते. दुकान मालकही तिला तितकंच प्रेम देतात. त्यामुळे सध्या ही गाय समाजमाध्यमात चर्चेत आहे. पशु कल्याण मंडळानं गाईला मिठी मारून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं आवाहन करणारं पत्रक काढलं. मात्र त्यावर उलटसुलट चर्चा झाल्यामुळे पत्रक मागे घेण्यात आलं.
जिल्ह्यातील चिमूर शहरातील गाईची सध्या जोरदार चर्चा आहे. शहरातील बाजारात पूजा वस्त्र भांडार दुकान आहे. गाय थेट या दुकानाच्या आत शिरते. दुकान मालक ओमप्रकाश जाकोटीया यांना गोंजारते. दुकान मालकालाही या गाईचा लळा लागला आहे. गाय दुकानात आल्यावर जाकोटिया तिला गूळ खायला देतात.
गूळ खाल्ल्यावर गाय दुकानात असलेल्या गादीवर बसते. तिच्यासाठी हा नित्याचाच प्रकार झाला आहे. बळीराजाच्या कुटुंबातील अविभाज्य घटक असलेल्या गोमातेच्या दिव्यत्वाची फार चर्चा केली जाते. मात्र अडचणीत असलेल्या या गोमातेकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. गाईला मिठी मारा, असं आव्हान करण्यात आलं होतं. ही मिठी जोरजबरदस्तीची ठरली असती. मात्र प्रेम दिनाच्या दिवशी चिमूरच्या गाईन मारलेली ही मिठी खरी “काऊ हग” ठरली आहे.