टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर त्याचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये या घसरणीनंतर इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. ज्यानंतर त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. इलॉन मस्क यांची गेल्या एका वर्षात 180 अब्ज डॉलरने संपत्ती कमी झाली आहे. फोर्ब्स मासिकानुसार, 2021 मध्ये इलॉन मस्क यांची संपत्ती 320 अब्ज डॉलर्स होती. जी जानेवारी 2023 मध्ये केवळ 138 अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे.
एवढ्या कमी वेळेत संपत्ती गमावण्याच्या बाबतीत इलॉन मस्क यांनी 22 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आतापर्यंत हा विक्रम जपानी टेक गुंतवणूकदार यांच्या नावावर होता. ज्यांनी वर्ष 2000 मध्ये 58.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली होती. पण आता इलॉन मस्क यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, इलॉन मस्क यांनी 200 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे आणि ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या व्यक्तीने 200 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. इलॉन मस्कच्या संपत्तीत इतकी घसरण झाली की, त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जाही गमावला. फ्रेंच लक्झरी ब्रँड Louis Vuitton चे प्रमोटर बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी मस्क यांना मागे सोडलं आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती 190 अब्ज डॉलर्स आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इलॉन मस्क यांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यतीचा मानही हिसकावून घेतला जाऊ शकतो. भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानीइलॉन मस्क यांना कधीही मागे टाकू शकतात. इलॉन मस्क यांची संपत्ती 130 बिलियन आहे, तर गौतम अदानी गे फक्त 10 बिलियन डॉलर्सने त्यांच्या मागे आहेत. त्यांची संपत्ती 120 बिलियन डॉलर्स आहे.