सन २०१० नंतर तब्बल १३ वर्षांनी पंढरपूरला रेल्वेने जाण्यासाठी सोलापूरकरांना दुसरा पर्याय गोलगुंबज एक्सप्रेसच्या रुपाने मिळाला आहे. आता दोन तासांत ६० रुपयांत पंढरपूरला जाणारी एक्सप्रेस सुरू झाली आहे. यामुळे सोलापूरकरांना विठोबाचे दर्शन घेणे आणि पंढरपूरकरांना सोलापुरात येऊन बाजार करणे सोपे होणार आहे. पंढरपूरला दोन रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्याने एकाच दिवसांत दर्शन व इतर कामे करून दगदग न करता संध्याकाळी परतणे सोपे झाले आहे. पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावर ये जा करणाऱ्या प्रवाशांनीही आता ही गाडी कायमस्वरूपी अशीच धावावी अशी विनंती केली आहे.
गोलगुंबज एक्स्प्रेसचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहोरे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक लक्ष्मण रणयेवले यांनी फलाट क्रमांक एकवर दक्षिणेकडून येणाऱ्या या गाडीचे स्वागत केले. श्री विठ्ठलाची प्रतिमा या गाडीला लावत पुष्पहार व नारळ अर्पण करून हिरवा झेंडा दाखवून रवानगी केली. यावेळी रेल फॅन्सी पियुष नाशिककर, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव व इतर प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पंढरपूरकडून म्हैसूरूला जाणाऱ्या गाडीला आमदार समाधान आवताडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.