बाहुबली फेम एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर परदेशात देखील आपली जादू दाखवली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. केवळ बॉक्स ऑफिसच नव्हे, तर हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात देखील भारताचे नाव गाजवत आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाने एका श्रेणीत पुरस्कार देखील पटकावला आहे.
एसएस राजामौलींचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘RRR’ दोन श्रेणींमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकित झाला होता. सध्या हा पुरस्कार सोहळा सुरू असून, या भारतीय चित्रपटाने इतिहास रचल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. ‘RRR’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे मोशन पिक्चर कॅटेगरी’साठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे जगभरात खूपच गाजले आहे. भारतीय चित्रपटाला या श्रेणीत पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.
‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी ‘आरआरआर’चे दिग्दर्शक एसएस राजामौली, अभिनेता राम चरण, जूनियर. एनटीआर आणि त्यांची पत्नी सध्या या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. ‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहेत. या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्रजी चित्रपट म्हणून, तर याच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचे नामांकन मिळाले होते.
‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट परदेशातही आपली जादू दाखवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे. जेव्हा हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी तिथल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन चाहत्यांची भेट घेतली. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्टसह श्रिया सरन, अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.