राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, मंगळवारपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहे. याकाळात त्यांचा राजभवन परिसरात मुक्काम असणार आहे. त्यामुळे मांडवी नदी, अरबी समुद्राचा राजभवन परिसर आणि झुआरी नदीमध्ये जलवाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.या संपूर्ण परिसरात ड्रोन वापरावर बंदी असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
यासोबतच गोव्याच्या दोनापावला या पर्यटनस्थळावर पर्यटकांना जाण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. यादरम्यान मंगळवारी दाबोळी विमानतळ-बांबोळी-दोना पावला-मिरामार-बांदोडकर सर्कलपर्यंतच्या रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे बुधवारी राजभवन ते बांबोळी (गोवा विद्यापीठ)-पर्वरी (विधानसभा संकुल) तर गुरुवारी राजभवन-बांबोळी-मेरशी जंक्शन-जीव्हीएम सर्कल फोंडा- बोरी ब्रीज-आयडीसी वेर्णा ते दाबोळी विमानतळापर्यंतच्या रस्त्यांवरही वाहतुकीसाठी निर्बंध असतील. तर 24 ऑगस्ट रोजी सकाळी राष्ट्रपती राज्यातील काही वारसास्थळांना भेट देऊन दिल्लीकडे रवाना होतील. त्यांच्या या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी राज्य प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पोलिस दलाच्या वतीने राज्यभरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
आगामी 3 दिवस अतिमहनीय व्यक्ती राज्यात असल्याने यादरम्यान सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी, विविध खात्यांचे सचिव, खातेप्रमुख तसेच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या गोवा भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पणजी, पर्वरी, वास्को आणि फोंडा परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.