पती पत्नीचा घरगुती वाद त्यांच्या १३ वर्षीय मुलीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गेल्या महिन्याभरापासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या पतीने आपल्या पोटच्या मुलीला कॅनलमध्ये फेकून दिले. ही घटना शुक्रवारी (१० फेब्रुवारी) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. पतीने दारूच्या नशेत पत्नीला फोन करून या प्रकाराबाबतची माहिती दिली आणि स्वतः पण विष प्राशन केल्याचं तिला सांगितलं. यानंतर पत्नीने चलबिचल होत शेजारी राहणाऱ्या स्थानिकांकडून माहिती घेतली. मात्र, पती घरात नसल्याचं कळल्यानंतर पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तनुश्री संदीप शिंदे (वय १३) असे या मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी वडील संदीप शिंदे (३६ अंदाजे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नी वृषाली शिंदे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती संदीप शिंदे हा रिक्षा चालक आहे. १३ वर्षांपूर्वी त्याचं आणि वृषालीचं (फिर्यादी पत्नी) लग्न झालं होतं. वृषालीचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. पतीला दारू पिण्याची आणि संशय घेण्याची सवय होती. त्यामूळे ५ वर्षा पूर्वी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. वाद घटस्फोट घेण्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, कुटुंबातल्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
गेल्या महिन्यात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. या प्रकरणाला महिना पूर्ण झाला होता. यादरम्यान, वृषालीच्या वडिलांनी घटस्फोट घेण्यासाठी देखील नोटीस पाठवली होती. यासर्वांमध्ये त्यांची १३ वर्षांची मुलगी तनुश्री हिच्यावर कधी आई कडे तर कधी वडिलांकडे राहण्याची वेळ आली. काल रात्री मुलीने आपल्या वाडिलांकडे जाण्याचा हट्ट केला, म्हणून संदीप तिला सोबत घेऊन घरी आला. त्यानंतर पहाटे ३ वाजता दारूच्या नशेत संदीप शिंदेने पत्नी वृषालीला फोन केला आणि सांगितलं की मी मुलीला कॅनलमध्ये फेकून दिलं आणि मी ही मरण्यासाठी विषप्राशन केलं आहे.
हे ऐकताच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली, तिला मोठा धक्का बसला. तिने तिच्या भावाला आणि मित्र मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा पती तिथे नव्हता म्हणून त्याच्या शोध घेण्यासाठी सगळे प्रयत्न करू लागले. काही वेळानंतर वृषालीच्या भावाला एका अज्ञात स्थळी संदीप रिक्षात बसलेला दिसला. त्याच्याकडून या घटनेची पुन्हा माहिती घेतली असता त्याने सांगितलं की सारसबाग येथील कॅनलमध्ये मी तनुश्रीला फेकून दिले. हे ऐकून आईला धक्का बसला. याची फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी पहाटे घटनास्थळी भेट देउन ४ वाजल्या पासून मुलीचा मृतदेहाचा शोध घेत आहे. घटनास्थळी पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी भेट दिली आणि या घटनेची माहिती घेतली. याबाबत पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी पाहणी करत आहे. मात्र, १२ तास उलटूनही मुलीचा मृतदेह सापडू शकलेला नाही. पोलीस या प्रकरणात युद्ध पातळीवर काम करत आहेत. मात्र, आरोपी पतीने विष प्राशन केल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.