घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्य एक संशयित फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे व पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, हेकॉ सोमनाथ कांबळे, योगेश पाटील, उमेश पवार, पानपाटील, विशाल पानपाटील, कुणाल शिंगाणे व धिरज सांगळे यांनी केली.
या संदर्भात धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकटी (ता. धुळे) युवराज देवराम पाटील याच्या बंद घराच्या कडीकोयंडा तोडून अज्ञात चोराने ५० हजार रूपयांची रोख रक्कम व २२ हजार रूपयांचे दोन तोळे सोन्याचे दागिने असा ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबविला होता. १३ ऑगस्ट २०२३ रोजी ही घटना घडाली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी स्वतंत्र पोलीस पथक तयार करून या चोरीचा तपास लावण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी सौद सलीम अन्सारी (वय-२२) रा. शंभर फुटी रस्ता सरदार हॉटेलच्या पाठीमागे इब्राहीम मशिद जवळ, धुळे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता अन्सारी याने त्याचा साथीदार हेमंत किरण मराठे रा. श्रीराम ट्रान्सपोटच्या मागे, धुळे याच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. अन्सारी याने यावेळी चोरीतील १४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी काढून दिला असून आता पोलीस हेमंत मराठे याचा शोध घेत आहेत.