गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे पोलिस विभागाकडून प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मंडळाच्या बैठका घेणे सुरू आहे. यात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाने खरे कान-नाक-डोळे आहेत, असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, ईद ची मिरवणूक ही सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तर गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दुपारी 3 नंतर काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर याबाबत मंडळनिहाय चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचा सामाजिक एकोपा अतिशय घट्ट आहे. तरीसुध्दा बाहेरच्या जिल्ह्यात ,राज्यात किंवा इतर ठिकाणी काही अघटीत घडल्यास त्याची प्रतिक्रिया चंद्रपुरात उमटू देऊ नका, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : – पीओपी मुर्तीच्या संदर्भात मनपाने मुर्तीकारांची बैठक घ्यावी. गणेश मंडळांनी परवानग्या कशा घ्याव्यात, याबाबत जनजागृती करावी. सोशल मिडीयावर अफवा पसरणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी. मनपाने कृत्रीम विसर्जन कुंड तयार करावे. मुर्तीचे नुकसान – मोडतोड होऊ नये म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंडळांनी गणेश मुर्तीसाठीची वाहने सुव्यवस्थित ठेवावी तसेच चालक मद्यप्राशन करणारा नसावा. डीजेबद्दलच्या नियमांची माहिती पोलिस विभागाने आपापल्या क्षेत्रातील मंडळांना द्यावी. मनपाने मंडळांना पेंडालचा आकार निश्चित करून द्यावा. एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या एकाच वेळी देण्यात याव्या. विद्युत विभागाने पेंडॉलमधील इलेक्ट्रिक व्यवस्थेची पाहणी करावी. दाताळा रोडवरील इरई नदी येथे विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म तयार करावा. सण – उत्सवाच्या दोन-तीन दिवसांपासून दारूविक्री बंद ठेवावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी मानले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.