उर्फी जावेद हिच्या कपड्यावरुन सुरु झालेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद महिला आयोगाला खडे बोल सुनावले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली आहे. या नोटीसमध्ये महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान करण्यात आले आहे. 1993 कलम 92 (2) (3) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवली असून खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल.
कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे. गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली, महिला आयोगानं तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आलेय.
ज्याअर्थी आपण एका महिलेच्या पेहेरावाबाबत पाच जानेवारी 2023 रोजी पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल, अशी वक्तवे केली आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या एका प्रकरणात आयोगानं काढलेल्या नोटीसीचे चुकीचे अन्वयार्थ लावून सदरील नोटीस प्रसार माध्यमांसमोर प्रदर्शित करुन आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल, असे वर्तन केले आहे. तसेच सदर वेळी आपण दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणांची हेतुपुरस्पर तुलना करुन दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्याआर्थी प्रस्तुत नोटीसीद्वारे आपणास निर्देशि करण्यात येते की, आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनिय, 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार आयोगास दोन दिवसात प्राप्त होईल, अशा रितीने खुलासा सादर करावा. अन्यथा याप्रकऱणी आपले काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरुन एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल.