साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी अभिनेत्री श्रुती हासन आणि अभिनेते रवी तेजा यांचा ‘वॉलटेर वीरय्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज होताच दोन दिवसांमध्ये जवळपास 50 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘वॉलटेर वीरय्या’ सोबत रिलीज झालेला ‘वीरा सिम्हा रेड्डी’ हा चित्रपट मात्र प्रेक्षकांची पसंती मिळवू शकला नाही.
‘वॉलटेर वीरय्या’ हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. के.एस. रवींद्र यांनी ‘वॉलटेर वीरय्या’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 29.6 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 19.8 कोटी कमावले. तसेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 20 कोटी कमाई केली आहे. आता या चित्रपटाला रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, नऊ दिवसात या चित्रपटानं 132 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातील चिरंजीवी यांच्या अॅक्शन, स्टाईल आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
‘वॉलटेर वीरय्या’ या चित्रपटात चिरंजीवी यांनी डॉनची भूमिका साकारली आहे. महापालिका आयुक्त एसीपी विक्रम सागर (रवी तेजा यांनी साकारलेले) शहरात आल्यावर या डॉनला त्याची पावर कमी होऊ शकते, असे वाटते. या चित्रपटातील अॅक्शन सिन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चिरंजीवी यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे.