छत्रपती संभाजीनगर : केरळात दाखल झालेल्या पावसाने कर्टनाटकच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पुढील 48 तासाच म्हणजेच सोमवारी 12 जून रोजी रात्री उशिरा अथवा मंगळवारी 13 जून पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण त्याआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या दोन तासांत छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.6 मिमी पाऊस अन् गारपीटीची नोंद एमजीएम वेधशाळेने केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी (10 जून) दिवसभर सूर्याच्या उष्णतेचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला, मात्र त्यानंतर संध्याकाळी पाचच्या आसपास आकाशात ढगांची गर्दी जमा व्हायला लागली आणि 46.7 किमी वेगाने वादळी वारे वाहू लागले. सहाच्या आसपास विजांच्या कडकडाटासह मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाला सुरूवात झाली. साडेआठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसाची 39.6 मिमी नोंद एमजीएम वेधशाळेने केली आहे. या कालावधीत टीव्ही सेंटर परिसरात 10 मिनिटे गारपीटही झाली.
विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला असला तरी आज संध्याकाळपर्यंत नागरिकांना उन्हाचा कडाक्यासह उकाडा जाणवेल आणि त्यानंतर आकाशात ढगांची पुन्हा एकदा गर्दी व्हायला लागले. मात्र जेथे पोषक वातावरण असेल तिथेच पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.
पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने
पुढील 48 तासात कर्नाटक तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भागात पावसाची शक्यता आहे. अनुकूल वातावरण अशल्यामुळे पुढील 48 तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला. परंतु पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव सध्या आणखी काही दिवसराहणार असल्याने मुंबईकरांच्या मान्सूनची प्रतीक्षा वाढली आहे. शुक्रवारी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला शनिवारी सुरूवात झाली आहे.