नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तुळजापुर तालुक्यातील रब्बी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावुन नेला आहे. ज्वारी गव्हासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. काढणीला आलेली ज्वारी या पावसामुळे आडवी पडली आहे. त्यामुळे ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर फळबागांचे विशेष करून द्राक्ष पिकाचे जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.
दि.२० मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तुळजापुर तालुक्यातील होर्टी गावास भेट देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकाची शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे, तालुका कृषी अधिकारी श्री बीडबाक,मंडळ अधिकारी श्री गांधले, एन. यु. शिंदे, तलाठी गणेश जगताप, शरद पवार, कृषिपर्यवेक्षक आर. एन. पवार आदीजन उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना नुकसान झालेले पीक दाखविले. त्याचबरोबर आम्हाला लवकर नुकसान भरपाई मिळाली नाही तर आमचे जगणे मुश्किल होणार असल्याचेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी गावचे माजी सरपंच संजय गुंजीटे,गिरीधर तुगावे, महादेव पाटील, ज्ञानेश्वर राजमाने यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.