संजू सॅमसनला भारतीय संघात कधीही सातत्यपूर्ण संधी मिळाली नाही. आशिया चषक स्पर्धेत त्याचा बॅकअप म्हणून निश्चितपणे समावेश करण्यात आला होता, पण केएल राहुल तंदुरुस्त परतल्यानंतर त्याचे संघात परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
आशिया चषक आणि विश्वचषक २०२३ नंतर आता आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारताचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याच्या चाहत्यांकडून याबाबत सतत सोशल मीडियावर भाष्य केले जात आहे. विश्वचषक संघात नाही पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी दोन वेगळे संघ जाहीर करण्यात आले त्यात पहिल्या दोन सामन्यांच्या संघातही त्याला संधी देण्यात आली नाही. यामुळे अधिक चर्चेला उधाण आले आहे. आता यावर खुद्द सजू सॅमसनने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज संजूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सोमवारी रात्री आभासी पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा केली होती, त्यानंतर काही तासांनी म्हणजे रात्री उशिरा संजू सॅमसनने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती ती म्हणजे त्याने फेसबुकवर एक स्माईली पोस्ट केला होता. त्यानंतर आता त्याची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.
काय म्हणाला संजू
संजू सॅमसनने टीम इंडियासाठी १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने ५५.७१ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत. अलीकडेच, स्टार फलंदाजाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन संधी देण्यात आल्या, त्यापैकी एका सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले. असे असूनही तो आशिया कप चॅम्पियन संघाचा भाग नव्हता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून सॅमसनला वगळल्यानंतर चाहत्यांच्या संतापाला पुन्हा एकदा उधाण आले आहे. दुर्लक्ष केल्यानंतर संजू सॅमसनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘जे आहे ते आहे, मी सतत पुढे जात राहणे निवडतो.’
इरफान पठाणही समर्थनार्थ पुढे आला
माजी अष्टपैलू इरफान पठाणने ट्विट केले की, ‘जर मी सध्या संजू सॅमसनच्या जागी असतो तर मी खूप निराश झालो असतो…’ इरफान पठाणचे हे ट्विटही सध्या व्हायरल झाले आहे. संजू सॅमसनकडे भारतीय संघाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.
संजू सॅमसनला केवळ आशिया चषकच नव्हे तर आशियाई क्रीडा स्पर्धेतही प्राधान्य दिले गेले नाही. जर संजू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या संघात नसेल तर तो विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असेल, अशा चर्चा सुरु होत्या. पण बीसीसीआयने त्याची विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. एकदिवसीय सामन्यात सॅमसनची सूर्यकुमार यादवशी तुलना केली तर संजू शर्यतीत पुढे असल्याचे दिसते, परंतु यावर्षी नशिबाने त्याला सातत्याने फटका बसला आहे. संजू सॅमसनच्या पोस्टवरील कमेंटमध्ये एका चाहत्याने त्याला २०२७ विश्वचषक विजेता कर्णधार म्हटले आहे.