मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. दरम्यान वांद्रे येथील राहत्या घरी आज, गुरुवारी सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘सरस्वतीचंद्र’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.
अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांचा मुलगा अजिंक्य देवही प्रसिध्द अभिनेता आहे.
सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ होते. सीमा देव आणि रमेश देव यांचा १ जुलै १९६३ रोजी विवाह झाला. वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केले होते. सीमा देव आणि रमेश देव यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचे पती अभिनेते रमेश देव यांचे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले.