झारखंडच्या पलामू येथे भरधाव कारने 12 जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात एका महिलेसह तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून उर्वरित गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचालकांनी वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला.
याबाबत स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावकरी रस्त्याच्या कडेला एकत्र उभे होते. दरम्यान, डाल्टनगंज गढवा मार्गावर गढवाच्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या कारने 12 जणांना धडक दिली. यामध्ये एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मधु मेहता असे मृत महिलेचे नाव असून उदल आणि रोहित चौरसिया हे काका-पुतणे देखील अपघातात मृत्यूमुखी पडले. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पलामूचे पोलिस अधीक्षक रमेशन यांनी सांगितलं की, या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून, कारच्या मालकावर गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर आमदार आलोक चौरसिया यांनी सर्व मृतांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केलीय.