पुण्यातून सुटणाऱ्या झेलम व हावडा एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळित होऊ नये म्हणून पुणे रेल्वे प्रशासनाने स्क्रॅच रेक तयार केला आहे. त्यामुळे एका गाडीला उशीर झाला तरी ती रद्द करावी लागणार नाही. परिणामी गाड्यांचा विलंब टळून प्रवाशांना दिलासा मिळेल.या गाड्या कधी रद्द कराव्या लागतात, तर कधी त्यांना २४ तासांहून जास्त उशीर होतो. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून प्रशासनाने मुंबईहून २४ एसी, जनरल व स्लीपरचे डबे एकत्र आणून त्यापासून स्क्रॅच रेल्वे तयार केली. एका गाडीला उशीर झाला किंवा ती रद्द करण्याची वेळ आली तर स्क्रॅच रेकचा पर्याय असेल.
पुणे- हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस व पुणे जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस या गाड्यांच्या बाबतीत प्रवाशांच्या अनेकदा तक्रारी येतात. नागपूर-बिलासपूर व मनमाड-भुसावळ सेक्शन मध्ये वारंवार नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येतो. दोन्ही गाड्यांना याचाच फटका बसतो. विशेषतः या दोन्ही गाड्या पुण्याच्या दिशेने येताना ब्लॉकमध्ये अडकतात. कधी त्या दुसऱ्या मार्गाने सोडल्या जातात, तर कधी विविध स्थानकांवर त्या थांबवून ठेवल्या जातात. परिणामी दोन्ही गाड्यांना पुण्याला येण्यास खूप उशीर होतो. पुण्यात गाडी पोचल्यावर त्यांची देखभालीसाठी सुमारे आठ तासांचा वेळ लागतो. त्यामुळे पुण्याहून दुसऱ्या दिवशी सुटणाऱ्या गाड्यांना उशीर होतो अथवा त्या रद्द करण्याची वेळ येते.