नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना 2 लाखांची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहिर केली आहे.
सिन्नर ते शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला असून, बसची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. असेही मोदींनी म्हटले आहे. मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मरण पावलेल्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाशिक-शिर्डी महामार्गावर मुंबईहून शिर्डीकडे येणाऱ्या पर्यटक बसची समोरासमोर धडक झाली. यावेळी बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते. यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ जवळच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे.
पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही बस मुंबईतील अंबरनाथ येथून प्रवाशांना शिर्डीला दर्शनासाठी घेऊन जात होती. सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.