जगावर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. यामध्ये ट्विटर, फेसबुकची मूळ मेटा, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आदी अनेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर, ट्विटरच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्याचवेळी ट्विटर इंडियाच्या निम्म्याहून अधिक लोकांना देखील नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या कर्मचाऱ्यांना एका भारतीय कंपनीने आधार दिला आहे.
भारतासह संपूर्ण जगात रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ट्विटरवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतातील ट्विटरचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरमधून काढण्यात आलेले कर्मचारी कू कंपनीत सहभागी होऊ शकतील.
ट्विटरने कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपण बोलावू इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितले. ट्विटरप्रमाणे, कू हे देखील एक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. जे अलिकडच्या काळात भारतात खूप प्रसिद्ध झाले आहे. मयंक बिदावतका यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ट्विटरवरून काढून टाकलेल्या सर्व प्रतिभावान लोकांना नोकरीची संधी देणार आहे. ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना ठेवून कंपनी पुढील योजना आणि प्लॅटफॉर्मचा विस्तार करेल असेही त्यांनी सांगितले.
इलॉन मस्कने ट्विटर टेकओव्हर केल्यापासून भारतात कू वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी सांगितले की, ते लवकरच विविध देशांमध्ये त्यांचे प्लॅटफॉर्म सुरू करणार आहेत. यामध्ये मिडल ईस्ट, आफ्रिका, बांगलादेश, फिलिपाइन्स या देशांच्या नावांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कंपनीला यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कू ही एक भारतीय कंपनी आहे आणि ती ३ वर्षांपूर्वी लॉन्च झाली होती. कू अॅप आतापर्यंत ५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे.