शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आल्यावर भिजलेली लाकडे, गळक छप्पर पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत. स्मशानभूमीमध्ये पावसाचे पाणी वरून गळत असल्याने तेथे ठेवलेली लाकडे भिजत आहेत. परिणामी शव जाळण्यासाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो.
पूर्वेकडील रामनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमीची अवस्था अतिशय खराब असल्याचे नागरिक सांगत आहेत. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत नागरीक अंत्यसंस्कारासाठी शव घेऊन या स्मशानभूमीत येत असतात. मात्र, येथे समस्या पाहून नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहेत. या स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत समाजसेवक जितेंद्र अमोणकर यांनी समाज माध्यमात विडिओ व्हायरल केला आहे. यावर अनेकांनी प्रशासनावर तशोरे ओढले आहेत.
याबाबत असे समजून येत आहे की, येथे कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. स्मशानभूमीचे छप्पर गळके असून त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नाही का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे याकडे अनेक वर्षांपासून सत्ताधारी व विरोधी पक्षाने याकडे लक्ष दिले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असेही नागरिक सांगत आहेत. तर अशा समस्या निर्माण होण्यासाठी पालिका प्रशासन जबाबदार आहे असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
याबाबत माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले की, स्मशानभूमीत लाकडांचा ठेका दिलेला आहे. जर लाकडे भिजत असतील तर त्याची काळजी त्या ठेजेदाराने घेतली पाहिजे. पत्रे गळत असतील तर त्याची दुरुस्ती केली पाहिजे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष घ्यायला पाहिजे. जर गळती होत असेल तर ही वाईट बाब आहे.
तर, याबाबत पंधरा दिवसांपूर्वी पदभार स्वीकारणाऱ्या ”ग” प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.