डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी २५ वर्षीय तरुणांनं आपल्या तीन मित्राच्या मदतीने चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. अकोला शहरातील डाबकी रोड पोलिस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील राधास्वामी सत्संग केंद्राजवळील एका गोदामाला चौघांनी लक्ष्य करत या गोदामातील चौकीदाराचे हातपाय बांधून तब्बल ५० लाख रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या सिगारेटच्या पेट्यांवर हात साफ केल्याचा प्रकार उघड झाला होता.
या चोरी प्रकरणी अकोला पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सिगारेट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५४ लाख १८ हजार इतकी आहे. आतीश सुनिल मलीये (वय २५ रा. गौसीया मज्जीद गुलझारपुरा अकोला) असं या आरोपीचे नाव असून, आतीशवर तब्बल २ लाखांवर कर्ज वाढले होते. म्हणून त्यानं ही चोरी केल्याचं पोलीस चौकशीत समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला शहरातील डाबकी रोड भागातील राधास्वामी सत्संग जवळ मनोहर मोटवाणी याचं सिगरेटचे गोदाम आहे. या गोदामात २८ मे रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास येथील चौकीदाराचे काही अज्ञात तीन लोकांनी बळजबरी हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर गोदामचे शटर उचकटून ५० लाख रुपयांचा मुद्देमाल या तिघांनी चोरून नेला होता.
यात विविध कंपनीच्या सिगारेट पाकिटांचा समावेश होता . चोरी प्रकरणी डाबकी पोलिसांत ३९२, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या हाती घेतला आणि तपासाची सूत्र वेगात फिरवली . तपासादरम्यान, चोरीतील मुख्य आरोपी आतीश सुनील मलीये(रा. गौसीया मज्जीद गुलजार पुरा अकोला) हा असल्याच समजलं. यानुसार त्याचा शोध घेवून आतिशला ताब्यात घेण्यात आले.