परळी( प्रतिनिधी): मराठा समाजासाठी तळमळीने अहोरात्र लढणारे शिवक्रांती सेनेचे संस्थापक संजय सावंत यांचे दुःखद निधन झाले. घरातली कर्ता व्यक्ती गेल्यावर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची परवड होईल. संजय सावंत यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांच्या पुढाकारातून मदत केली.
संजय सावंत यांचे मराठा समाजाच्या चळवळीत मोठे योगदान होते. समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकर घेऊन मदत केली. त्यांच्या पश्चात कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी खारीचा वाटा म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, मराठा भूषण मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांनी ३ लाख रुपये रोख त्यांच्या पत्नी अर्चना संजय सावंत यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आले. या सोबतच सावंत यांच्या मुलाचे व मुलीचे पालकत्व आरोग्यमंत्री, मराठा भूषण मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांनी स्वीकारले आहे. माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याच्या कुटुंबाप्रती ही माझी नैतिक जबाबदारी आहे अश्या भावना साहेबांनी व्यक्त केल्या.
चळवळीत काम करणाऱ्या माझ्या प्रत्येक बांधवास माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या सर्वांवर आपापल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. चळवळीत काम करताना आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका असे आव्हान देखील सावंत साहेबांनी केले.
यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे, महेश डोंगरे, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिकराव खांडे, आशोकराव हिंगे, गंगाधर काळकुटे, शंकर कापसे, सुनिल बोडके, सोमनाथ मगर, अनिल साळुंके, सुभाष जाधव, भारत काळे, बळवंत कदम, नाना माशेरे,नागेश मिठे हे उपस्थित होते.