तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपाल आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलीय. नीट परीक्षा पास होऊ न शकल्याने एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आणि त्याच्या वडिलांनीही गळपास घेऊन आत्महत्या केली. यावरुन तमिळनाडूमध्ये खदखद निर्माण झाली आहे. स्टॅलिन यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातून नीट परीक्षा वगळण्यासाठी तामिळनाडू सरकारने विधेयक राज्यपाल रवी यांच्याकडे पाठवले होते. पण, राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली नाही. तसेच विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मूर्मी यांच्याकडे पाठवून दिले. यावर संताप व्यक्त करत स्टॅलिन यांनी म्हटले, सलग 7 वर्षाच्या संघर्षाचा राज्यपालांनी अपमान केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी द्यावी यासाठी त्यांना पत्र लिहिणार आहे. तमिळ विद्यार्थ्यांचे भविष्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही यावर्षी इथे आणि पुढच्या वर्षी दुसरीकडे जाणारे नाही. आम्ही सत्तेत असू किंवा नसू लोकांसाठी आवाज उठवत राहू, असे स्टॅलिन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यपाल विश्वविद्यालयांना नष्ट करत आहेत. विधेयक त्यांनी मंजूर केलेले नाही. त्यामुळे मी त्यांची निंदा करतो. त्यामुळेच मी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे.