तुर्की आणि सिरियात झालेल्या भूकंपात आतापर्यंत एक हजार 388 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर जखमींची संख्या सहा हजार 400 पेक्षा जास्त आहे. सोमवारी सकाळी 7.9 रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की आणि सिरिया हादरलं आहे. या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे.
भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या. अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन भारताने दिले आहे.
तुर्की आणि सिरियात भूकंपामुळे हाहा:कार माजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतर सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी बैठक बोलवली असून तुर्की आणि सिरियाला मदत पाठवण्यावर चर्चा केली. एनडीआरएफचे जवान आणि बचावपथकांना तुर्की आणि सिरियाला पाठवण्यात येणार असल्याचं ठरलं आहे. 100 जणांची दोन पथकेही तात्काळ रवाना होणार आहेत. त्याशिवाय औषधं, गोळ्या, डॉक्टर अन् इतर मेडिकल मदत पाठवण्यात येणार आहे.
स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. तुर्कस्तानच्या गाझियानटेपजवळ भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामध्ये मोठं नुकसान झालेय. यूएस जियोलॉजिकल सर्विसनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक इमारती कोसळून जमीनदोस्त झाल्याचं व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतंय. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. लोक भयभीत होऊन आक्रोश करताना दिसत आहेत. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये ते तुर्कीतील भूकंपाचे असल्याचा दावा केला जात आहे. शक्तिशाली भूकंपानंतर तुर्कीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. भूकंपामुळे दोन्ही देशात झालेल्या नुकसानीचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत. भूकंपामुळे झालेलं नुकसान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे दिसतंय.