औरंगाबाद, 04 नोव्हेंबर 2022 ः
हिवाळा ऋतू पिकांसह पैलवानांसाठी पोषक समजला जातो. खास करून या ऋतूमध्ये पैलवान आपल्या तालमीसह खुराकवर भर देतात. कुस्त्यांचे फड रंगल्याशिवाय कोणतीच जत्रा, यात्रा, उरुस, उत्सवाला वैभव प्राप्त झाल्यासारखे वाटत नाही. अलीकडील काळात दुष्काळस्थिती व दानशूर व्यक्तींनी आखडता हात घेतल्याने कुस्तीलाही अवकळा प्राप्त झाली आहे. पूर्वी घरोघरी गायी, म्हशी असल्याने दूध निघत असे. आता चारा-वैरणी अभावी दुग्धव्यवसाय संकटात सापडून दुधासह सुक्यामेव्याचे भाव गगनाला भिडले.
आर्थिक टंचाईमुळे त्यास अत्यल्प उठाव असल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) चौफेर ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढल्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा दुकानदारांनी व्यक्त केली आहे.प्रत्येकाला महागाईत घर चालविणे कठीण झाल्याने पैलवानाची कसरत पाहता जेमतेम खुराक तोकडा पडत असल्याचे चित्र आहे.
सध्याचे तरुण केवळ धावणे, व्यायाम करणे इतकाच धडा आत्मसात करीत असून त्यातच महागाईमुळे सर्वाना खुराक घेणे आवाक्याबाहेरचे काम वाटत आहे. एका माणसाचा खुराक म्हणजे अख्ख्या कुटुंबाचा खर्च उचलण्यासारखी स्थिती आहे. हिवाळ्याला प्रारंभ होताच शहरांसह ग्रामीण भागात सुकामेव्याची दुकाने थाटली जातात. यंदाही तेच चित्र पाहावयास मिळत असून बदाम, काजू, खोबरा, जर्दाळू, पिस्ता, गोडंबी, डिंकाचे भाव सर्वसामान्यांच्या खिशांना परवडणारे नाहीत.