महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासाबाबतचा अंतिम अहवाल १३ सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, ॲड. संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्ध आराेप निश्चित करण्यात आले आहेत.
डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची बचाव पक्षाकडून उलटतपासणी घेण्यात आली. मंगळवारी (५ सप्टेंबर) उलटतपासणी पूर्ण झाली. ॲड. सुवर्णा वस्त यांनी सिंग यांची उलट तपासणी घेतली. आतापर्यंत सीबीआयकडून याप्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील डाॅ. अजय तावरे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रानगट, तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी घेण्यात आली.