मराठीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. नुकताच त्यांच्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटामुळे ते चर्चेत होते. मात्र, आता महेश मांजरेकर पुन्हा अडचणीत आले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात झालेल्या अपघातामुळे त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ चित्रपट दिगदर्शक महेश मांजरेकर आणि टेभुर्णीतील आश्रमशाळेचे संस्थाचालक कैलास सातपुते यांच्यात अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी संस्थाचालक कैलास सातपुते यांच्याविषयी बदनामी करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी माढा न्यायालयाच्यावतीने टेभुर्णी पोलिसांना महेश मांजरेकर यांच्याविरुध्द चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याबरोबरच पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.