ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे मुंबईत निधन झाले आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. १९५१ सालच्या लाखाची गोष्ट या चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांचे खरे नाव कुसुम असे होते मात्र चित्रपटातील नावानेच त्यांना पुढे ओळखले जाऊ लागले होते. निर्माते दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा नवाथे यांनी विवाह केला होता. त्यांची बहीण रेखा कामत यांचे देखील काही महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. चित्रा नवाथे यांनी अनेक चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. टिंग्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. आज सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रा नवाथे या चौघी बहिणी आणि दोन भाऊ असे त्यांचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते. प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक या त्यांच्या धाकट्या बहीण आहेत तर अभिनेत्री निर्माती मनवा नाईक या त्यांची भाची आहेत.
चित्रा नवाथे जुहू येथील बंगल्यात एकट्याच राहत होत्या. मधल्या काळात त्यांनी काही चित्रपटातून आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या त्या भूमिकांचे पुरस्कार देऊन कौतुक केले होते. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने त्यांना सरला नर्सिंग होममध्ये ठेवलं होतं मात्र महा ‘मारीच्या काळात तेथून त्यांना निघून जाण्यास सांगितलं. मधल्या काळात त्या कुठे होत्या याचा ठावठिकाणा त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा नव्हता मात्र या चर्चेनंतर त्या मुलुंड येथील “गोल्डन वृद्धाश्रमात” असल्याचे समोर आले होते. मुंबईत भवानीशंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचे ७ वीपर्यंतचे शिक्षण झाले आणि आर्थिक परिस्थितीमुळे चित्रा यांना विद्यामंदिराऐवजी चित्रमंदिरात प्रवेश करावा लागला. त्यांनी चित्रपट स्टुडिओचा उंबरठा ओलांडला आणि कलावंत म्हणून ग.दि. माडगूळकरांनी दिलेले ‘चित्रा’ हे नाव सार्थ करून दाखवले. १९५१ साली ‘ लाखाची गोष्ट’ हा त्यांनी प्रमुख नायिका म्हणून पहिला चित्रपट साकारला होता. त्यानंतर वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलविता धनी या चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावल्या तर बोक्या सातबंडे, अगडबम, टिंग्या या चित्रपटात त्यांनी आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रा यांचे लग्न सहदिग्दर्शक राजा नवाथे यांच्यासोबत झाले होते.