मोहोळ तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, यासाठी तालुका कृषी विभाग, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी वस्तुस्थितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी दिली.
आता तरी तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत होणार का ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.जुलै महिना वगळता संपूर्ण पावसाळा कोरडा गेला. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी केलेली तूर, उडीद, सोयाबीन ही पिके जळून गेली. पाऊसच न पडल्याने खरिपाच्या पेरण्याही झाल्या नाहीत तर ऊस लागवडीही झाल्या नाहीत. विहिरी व बोअरची पाणीपातळी खालावली आहे. परिणामी शेतीचा व पिण्याच्या पाण्याची आतापासूनच टंचाई जाणवू लागली आहे.सलग २४ दिवस भरवशाच्या नक्षत्रात पावसाचा खंड पडला. केवळ जुलैमध्ये पडलेल्या पावसाच्या चुकीच्या आकडेवारी आधारित तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात.