यावर्षीच्या हंगामात पावसाने तालुक्यात उशिरा एन्ट्री केल्याने पेरणी उशिरा झाली. त्यात जवळपास एक महिन्यापासून जून महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पाऊस आला नाही. मधल्या काळात पाऊस थोडाफार झाला. त्यानंतर २० जुलैपासून पाऊस गायब झाला आहे. जवळजवळ २५ ते ३० दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास काढून घेतल्याची अवस्था झाली आहे. दरम्यान, आमदार बळवंत वानखडे यांनी नुकतीच शेतीची पाहणी केली असून दुष्काळ परिस्थितीसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.
अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सोयाबीन कपाशी पीक पावसाअभावी करपायला सुरुवात झाली आहे. पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने सोयाबीनचे 100 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ आणि 100 टक्के विमा देण्याची मागणी आमदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. पिकांसाठी आवश्यक लागणारा ओलावा जमिनीत शिल्लक नाही, त्यामुळे पीक सुकायला सुरुवात झाली आहे.