राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला मंगळवारी रात्री 12.30 वाजता अपघात झाला. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन ते परळीकडे परत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात परळी शहरात झाला. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार आहे. ब्रिज कॅन्डी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी धनंजय मुंडे दुपारी दोन वाजता लातूरवरुन रवाना होणार आहे. एअर ॲम्बुलन्सने धनंजय मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
कारला अपघात झाल्याची माहिती ट्वीट करुन धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी ट्वीट करताना केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलं आहे.