सोलापूर महापालिकेसह बार्शी, करमाळा, कुर्डुवाडी या नगरपालिका व इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेडचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १०० ग्रामपंचायतींनाही उजनीचाच आधार आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने उजनीतील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. खरीप हंगामासाठी पाणी सोडणे सद्य:स्थितीत कठीण असल्याने ऐन पावसाळ्यात जिल्ह्यावर दुष्काळाचे (पाणी टंचाई) सावट निर्माण झाले आहे.
सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. दुसरीकडे बारामती, इंदापूर, सोलापूर येथील एमआयडीसींनाही उजनीतूनच पाणी जाते. तसेच उजनी धरणावर अंदाजे ३५ लाख लोकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.गतवर्षी २४ ऑगस्टपर्यंत उजनी धरण ९९ टक्क्यांपर्यंत भरले होते आणि दौंडवरून २२ हजार क्युसेकचा विसर्ग धरणात येत असल्याने कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनेसह नदीतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडला जात होता. पण, यंदा स्थिती चिंताजनक असून धरण अद्याप १३ टक्क्यांवरच स्थिर असून सात मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे.