आंध्र प्रदेशमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघाताच्या प्राथमिक तपासात, या धडकेसाठी रायगडा पॅसेंजर रेल्वेचा चालक आणि सहचालक यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांची संख्या १४वर पोहोचली असून, जखमींची संख्या ५० झाली आहे.
प्राथमिक तपासाच्या अहवालावर सात तज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘या सर्वांनी अपघातस्थळ, उपलब्ध पुरावे, संबंधित अधिकाऱ्यांची विधाने, डेटा लॉगर अहवाल आणि स्पीडोमीटर चार्ट यांची अत्यंत काळजीपूर्वक पाहणी केली. दोन सदोष स्वयंचलित सिग्नल ओलांडल्यामुळे रायगडा पॅसेंजर रेल्वेने विशाखापट्टणम पलासा पॅसेंजर रेल्वेला पाठीमागून धडक दिली. या वेळी पलासा पॅसेंजर प्रतिबंधित वेगाने धावत होती. त्यामुळे या अपघाताला रायगडा पॅसेंजरचे लोको पायलट एस. एम. एस. राव (वय ५२) आणि सहायक लोको पायलट चिरंजीवी (वय २९) हे दोघे जबाबदार असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला,’ असे अहवालात नमूद केले आहे.
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशात दोन प्रवासी रेल्वेंची धडक झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १४वर पोहोचली असून, जखमींची संख्याही ५० झाली आहे. १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. जखमींना विशाखापट्टणम व विजयनगरम येथील रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या अपघातात पलासा पॅसेंजरचे गार्ड एम. एस. राव (वय ५८) यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी सोमवारी विजयनगरम सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या उपचार आणि सुविधांबाबत विचारपूस केली.
खर्गे यांची केंद्रावर टीका
नवी दिल्ली : आंध्रमधील रेल्वे अपघातावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘धूमधडाक्यात गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना जो उत्साह दाखवला जातो, तोच उत्साह रेल्वेची सुरक्षा आणि प्रवाशांच्या हितासाठी आवश्यक कृतीतही दिसला पाहिजे’, असा टोला खर्गे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून लगावला आहे.