नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात ७२ प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. या सगळ्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या विमानात ५ भारतीय होते. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले सोनू जयस्वाल नेपाळमध्ये पशुपतीनाथाच्या दर्शनाला गेले होते. सहा महिन्यांपूर्वी सोनू यांना मुलगा झाला. त्यासाठी त्यांनी पशुपतीनाथाकडे नवस केला होता. मनोकामना पूर्ण झाल्यानं सोनू नवस फेडण्यासाठी पशुपतीनाथाच्या दर्शनाला गेले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
विमान अपघाताची बातमी कळताच सोनू जयस्वाल यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. सोनू यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन मुली झाल्यानंतर त्यांनी मुलासाठी नवस केला होता. तो पूर्ण झाल्यानं ते पशुपतीनाथाच्या दर्शनाला गेले होते. त्यांचे नातेवाईक विजय जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
सोनू त्यांच्या ३ मित्रांसोबत १० जानेवारीला नेपाळला गेले होते. मुलगा झाल्यानं सोनू यांचा नवस पूर्ण झाला होता. तोच फेडण्यासाठी ते पशुपतीनाथ मंदिरात गेले होते, असं विजय जयस्वाल यांनी सांगितलं. सोनू यांचं बियरचं दुकान आहे. ते सध्या वाराणसीच्या सारनाथ येथे राहतात. अलावलपूरमध्येही त्यांचं एक घर आहे. सोनू यांच्यासोबत अभिषेक कुशवाहा, विशाल शर्मा आणि कुमार राजभरदेखील नेपाळला गेले होते. त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला.
विशाल शर्मा अलावलपूरचे रहिवासी होते. तर अनिल राजभर झैनब आणि अभिषेक कुशवाह धारवात वास्तव्यास होते. राजभर जनसेवा केंद्र चालवायचे. कुशवाह यांचा कॉम्प्युटरचा व्यवसाय होता. विशाल शर्मा टू व्हिलरच्या शोरूममध्ये काम करायचे. पोखरात पॅराग्लायडिंग करून ते मंगळवारी गाझीपूरला परतणार होते.
चार जीवलग मित्रांच्या निधनानं गाझीपूरवर शोककळा पसरली आहे. पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चौघांनी व्हिडीओ चित्रित केला होता. पोखरा जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती चौघांचे मित्र असलेल्या दिलीप वर्मांनी दिली. चौघे बसनं पोखराला जाणार होते. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी अचानक प्लान बदलला आणि विमानाचं तिकीट काढलं. दुर्दैवानं त्यांचा हा निर्णय चुकला आणि हा प्रवास अखेरचा ठरला, असं वर्मा म्हणाले.