राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. मात्र, नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्यावतीने आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईतल्या कुर्ला इथल्या जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. याआधी त्यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबरला निकाल अपेक्षित होता, पण निकालाचं कामकाज पूर्ण न झाल्याने आज निकाल देण्यात आला. याआधीही मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्यावर प्रकृती अस्वस्थामुळे कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवाब मलिक जामीन यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. गोवावाला कंपाउंडची जमीन ही कमी भावात घेतली. तक्रारदार मुनिरा प्लम्बर यांनी यांची जमीन ही कोठ्यावधी रुपयांची होती, ती कमी भावाने घेतली हे चौकशीत सिद्ध झालं आहे. तक्रारदार यांचा जवाब हा अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. या जमिनीचा व्यवहार हा विवादित व्यक्तींसोबत झाल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.
हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीनं आरोप केलाय. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले hote. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही. त्यामुळं आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.