भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन येत्या 28 मे रोजी पार पडणार आहे. संसदेच्या या नव्या इमारतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत नव्या संसदेच्या इमारतीचे अंतरंग उलगडून दाखवणारा व्हीडिओ शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले की, नवीन संसद भवनाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. हा व्हिडिओ या प्रतिष्ठित इमारतीची झलक देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की, नव्या संसद भवनाचा हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या व्हॉइस-ओव्हरने शेअर करा. यातून तुमचे विचार व्यक्त होतील. मी त्यापैकी काही री-ट्विट करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
कशी आहे ही नवी इमारत?
ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील.