विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात अखेरच्या तासात झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांची बंडखोरी कायम असून पक्षाने त्यांची तात्काळ हकालपट्टी केली. दरम्यान, आघाडीकडून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देण्याचे संकेत काँग्रेसने दिले.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपानुसार नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली. गंगाधर नाकाडे यांनी अर्ज भरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची शनिवारी मुंबईत बैठक झाली. पूर्ण ताकदीने प्रचाराला लागण्याचा निर्धार करण्यात आला. येत्या २१ जानेवारी रोजी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक नागपुरात निश्चित करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत तेच कायम राहतील, असे सांगण्यात आले. सेना नेते खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या सभांचे नियोजन केले जात असताना दोन वाजताच्या सुमारास नाकाडे यांना शिक्षक सेनेचे ज. मो. अभ्यंकर यांचा माघार घेण्याचा फोन आला. अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली. अर्थात नाकाडे यांनाही थोडी कल्पना आली होती. त्यामुळे जगनाडे चौकातील कॉलेजमधून ते कारने सिव्हिल लाईन्समधील विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले. अर्ज मागे घेण्यासाठी तेव्हा ७ मिनिटे शिल्लक होती. अखेर त्यांनी अर्ज मागे घेतला.
निवडणुकीसाठी पाच वर्षांपासून तयारी होती. पक्षाने विश्वास दाखवला आणि आज अर्ज मागे घेण्याची सूचना केली. कुणी गेम केला की नाही, याची काहीच कल्पना नाही. पक्षाच्या आदेशाचे पालन केले व पुढील कार्य सूचनेनुसार राहील, असे गंगाधर नाकाडे यांनी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी अर्ज भरल्यानंतर पक्षाकडून त्यांना माघार घेण्याची सूचना करण्यात आली. त्यांनी तशी तयारी दर्शवली. सोमवारी दुपारपर्यंत ते नेत्यांच्या संपर्कात होते. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी इटकेलवार यांचा संवाद साधून दिला. या चर्चेदरम्यान माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितल्यावर दुपारी १ वाजता नंतर ते ‘नॉट रिचेबल’झाले.
पक्षविरोधी कृतीबद्दल सतीश इटकेलवार यांची शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी तात्काळ हकालपट्टी केली. महाविकास आघाडी ठरवेल, त्या उमेदवारासोबत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.