जिल्ह्यातील चांदवडजवळ भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजपच्या नगरसेवकाचा देखील समावेश आहे. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
मुंबईकडून धुळे येथे जात असताना चांदवड येथील केदराई फाटा येथे नमोकार तीर्थासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने धडक दिली. मुंबई – आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. सर्व मृत हे धुळ्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्रवासी अपघातामध्ये किरण हरिश्चंद्र अहिरराव हे धुळ्याचे नगरसेवकसुद्धा मृत्युमुखी पडले. किरण अहिरराव हे नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांचे भाऊ असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच सोमा टोल पथक आणि पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. सर्व मृतांना तातडीने चांदवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळविण्यात आले त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.