साखरेचा पुरवठा करतो, असे सांगून एका ट्रेडिंग कंपनीच्या मालकाची पाच जणांनी सव्वाबावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गौतम भाऊसाहेब वाडेकर (वय 38, रा. साईराज अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) यांची पाथर्डी फाटा येथे जय बजरंग ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीतर्फे किरकोळ दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला जातो.
दरम्यान, आरोपी अददागिरी समीर कुमार, अदागिरी श्रीरामलू, कल्लूगुट्टी चरणकुमार, राघवेंद्रकुमार श्रीरामलू अददागिरी व कोटापल्ली नरेश यांनी वाडेकर यांच्याशी संपर्क साधून साखरेचा पुरवठा करतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. 1 ते 11 जुलै या कालावधीत पाचही आरोपींनी फिर्यादी गौतम वाडेकर यांच्याकडून आरटीजीएसद्वारे एकूण 22 लाख 24 हजार 500 रुपयांची रक्कम स्वीकारली; मात्र ही रक्कम स्वीकारूनही आरोपींनी साखरेचा पुरवठा केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर वाडेकर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच व्यापार्यांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.