नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज, रविवारी सकाळी 7.39 वाजता भूकंप झाला. धाडिंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचे हादरे बिहारपासून दिल्लीपर्यंत जाणवलेत.
नेपाळच्या धांडिग येथे जमिनीपासून 10 किलोमीटर खाली हा भूकंप झाला. बिहारमध्ये आणि नेपाळच्या लगतच्या तराई भागात त्याचा सौम्य प्रभाव जाणवला. नेपाळपासून सुरू झालेल्या भूकंपाचे हादरे भारतात बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालपर्यंत जाणवले. उत्तर प्रदेशातील महाराजगंज, थूठीबाडी, सौनोली, सिद्धार्थनगर, बहराइच, श्रावस्ती, लखनऊ, प्रयागराज येथे भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारमध्ये रक्सौल आणि मधुबनीसह सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव अधिक होता. तसेच पाटणा, गया, पश्चिम चंपारण, सारण, सिवान, गोपालगंज, वाल्मिकीनगर, बेतिया, मोतिहारी येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
नेपाळमध्ये भूकंप सामान्य आहेत, जे तिबेटी आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांच्या जवळ येतात आणि दर 100 वर्षांनी सुमारे दोन मीटरने एकमेकांच्या जवळ जातात, ज्यामुळे भूकंप होतात, दबाव निर्माण होतो. ऑक्टोबर महिन्यात येथे भूकंपाची ही पाचवी घटना आहे.यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी नेपाळमध्ये एका तासात 4 भूकंप झाले होते. त्यावेळ 4.6 रिश्टर स्केलचा पहिला भूकंप पश्चिम नेपाळमध्ये 2:25 वाजता 10 किलोमीटर खोलीवर आला, त्यानंतर दुपारी 2:51 वाजता 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच 3.6 आणि 3.1 रिश्टर स्केलचे आणखी 2 भूकंप दुपारी 3:06 आणि 3:19 वाजता झाले होते.