दीपिका पदुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला.
दीपिकाच्या बिकिनी वादादरम्यान तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटामधील तिचे काही संवाद पुन्हा चर्चेत आले आहेत. रंग व धर्माचा काहीही संबंध नाही असं सांगणारा हा व्हिडीओ आहे.
“प्रत्येक धर्माने त्यांचा रंग निवडला आहे हे खरं आहे. पण धर्माला कोणताच रंग नसतो. कधीकधी व्यक्तीचं मन नक्कीच काळं होतं ज्याला धर्मामध्येही रंग दिसू लागतो.” दीपिकाचे या व्हिडीओमधील संवाद अनेकांनी ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादाशी जोडले आहेत.
दीपिकाचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होत असताना ‘पठाण’ चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. तर दीपिकाच्या बिकिनी वादावर काही कलाकार मंडळींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. आता या वादाचा चित्रपटावर कितपत परिणाम होणार हे पाहावं लागेल.