विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान झाले आहे. यात गडचिरोली येथे दुपारी एकवाजतापर्यंत 69.60 टक्के मतदान झाले होते. तर आतापर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. विभागातील इतर जिल्ह्यातील आकडेवारी खालील प्रमाणे नागपूर 52.75 टक्के, वर्धा 67.06 टक्के, चंद्रपूर 69.06 टक्के, भंडारा 63.58 टक्के, गोंदिया 57.18 टक्के मतदान झाले आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान झालं.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान धुळे जिल्ह्यात झालं.
– सर्वाधिक 34.05 टक्के मतदान धुळे जिल्ह्यात
– नगर जिल्ह्यात 32.55 टक्के,
– नंदुरबार जिल्ह्यात 31.73 टक्के
– नाशिक जिल्ह्यात 29.91 टक्के,
– जळगाव जिल्ह्यात 30.93 टक्के
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी काल रात्री 54 लाख रुपयांची रक्कम पकडली आहे. पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीदरम्यान एका चारचाकी वाहनात ही रक्कम आढळली. संबंधित रक्कम ही वाडेगाव येथील एका ब्लँकेट, बेडशीटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झालं आहे. या व्यापाऱ्याने आज सकाळी बिलं सादर केल्यानंतर पोलिसांनी रक्कम मालकाच्या स्वाधीन केली आहे. या प्रकरणावर पोलिसांनी ‘इन कॅमेरा’ बोलणं टाळलं.
अमरावती पदवीधर मतदारसंघांची निवडणूक आज पार पडत आहे. वाशिममधील मानोरा तालुक्यात दोन ठिकाणी मतदान केंद्र आहेत. अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी येथील मासुपा कॉलेजमधील मतदान केंद्रात येऊन बनियानवरच मतदान केले आहे. पदवीधरांच्या मागण्यांसाठी आणि विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे, जुनी पेंशन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी शर्ट काढून बनियानवर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचार सुद्धा बनियानवर करुन आज मतदान सुद्धा बनियानवर केले आहे. त्यामुळे या उमेदवाराची सर्वत्र चर्चा होत आहे.