भला मोठा गाजावाजा करून सोनपेठ नागरी बँकेने घेतलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचे गट्टे कचऱ्याच्या ढिगार्यात फेकून दिल्याने व लाखो रुपयांच्या उधळपट्टीमुळे सभासदामधून नाराजीचा सूर निघत आहे. त्यामुळे तालुक्यातील सभासदांच्या घामाच्या दामावर उभी राहिलेल्या नागरी बँकेच्या वर्धापन दिनावर व्यवस्थापकीय संचालक मंडळांनी केलेली पैशाची उधळण ही सभासदांच्या जिव्हारी लागल्याचे सभासदांमधून ऐकावयास मिळत आहे.
सोनपेठ शहरामध्ये सोनपेठ नागरी बँकेचे रोपटे सौ मंगलाताई मोरे व हरिभाऊ मोरे या दांपत्याने लावले खरे, परंतु या रोपट्याचा वटवृक्ष होऊन बँक नावारूपाला येताच संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये बँक त्यांच्या ताब्यातून निसटली. रविवार दि. 12 मार्च रोजी बँकेच्या नवीन संचालक मंडळांनी बँकेचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात करण्याचा प्रयत्न केला परंतू बहुतांश सभासदांनी पाट फिरवल्याने प्रतिसाद मिळाला नाही. वर्धापन दिनावर नको त्या कामासाठी लाखो रुपयांच्या पैशाची उधळण बॅंकेच्या तिजोरीतून केली. ज्या सभासदांनी स्वतःच्या घामाच्या पैशांवर बॅंकेचे शेअर घेतले त्यांच्याच पैशाची अशी झालेली उधळपट्टी व फुजूल छापलेल्या निमंत्रण पत्रिकेचे गट्टे कचऱ्याच्या ढिगार्यात पाहून सभासदांचे मन सुन्न झाले.नविन संचालक मंडळाच्या मनमानीचा परिपाक या निमित्ताने दिसून आला.