परळी तालुक्यातील मौजे देशमुख टाकळी, सिरसाळा, पांगरी,पिंपळगाव, वडखेल, कौठळी, रेवली, वाका इंजेगाव यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने पिकांची प्रचंड हानी होवुन बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून परळी शहर व तालुक्याला अवकाळी चा तडाखा बसत असून आज परत परळी तालुक्यात जोराच्या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. आज दुपारपासून देशमुख टाकळी सिरसाळा, पिंपळगाव, वडखेल, रेवली, वाका इंजेगाव या परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला. या मध्ये ज्वारी सोयाबीन, हरभरा, फुलकोबी, टरबुज, आंबा आदी पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची मोठी तारांबळ उडाली आहे. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास ह्या अनैसर्गिक पावसाने हिरावून घेतला आहे.
विज पडून म्हैस दगावली…
गेल्या दोन दिवसापासून परळी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने कहर माजवला असून आज दिनांक 18 मार्च रोजी दुपारी तालुक्यातील मौजे हसनाबाद या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामध्ये गट नंबर 51 मध्ये श्री सुग्रीव अश्रू रवळे या पशुपालकाची म्हैस दगावल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तहसीलदार शेजुळ यांच्या नुकसानग्रस्त गावांना भेटी
दरम्यान दोन दिवसापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, वादळी वारा, व विजेच्या गडगडाटासह होणारी गारपीट यामुळे तालुक्यातील बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या अस्मानी संकटाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आज दिनांक 18 मार्च रोजी महसूल प्रशासनाच्या वतीने परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ तथा नायब तहसीलदार बी. एल. रुपनर यांनी तालुक्यातील मौजे देशमुख टाकळी, कौठळी, पांगरी, तळेगाव यासह विविध नुकसानग्रस्त व गारपीटग्रस्त गावांना भेटी देऊन थेट बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली असल्याची माहितीही महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.