नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे.विमान अपघातामध्ये आतापपर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचं दिसतेय. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याचं समोर आले आहे. यामध्ये पाच भारतीय होते.
विमानात 53 नेपाळमधील, पाच भारतीय, चार रशियाचे, एक आयरिश, दोन कोरियन आणि अर्जेंटिना आणि फ्रेंचमधील एका एका प्रवाशाचा समावेश असल्याची माहिती स्थानिक विमानतळ प्रशासनानं दिली आहे.हवामान खराब असतानाही यती एअरलाइनच्या एटीआर-72 विमानाने उड्डाण केल्याचं समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. पोखरा येथील सेती खोच येथे हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली. यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य वेगात सुरु आहे. अनेकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खराब हवामान असताना पोखरा अंतरराष्ट्रीय विमानातळावर लँडिंग करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यावेळीच विमान कोसळलं. पोखरा विमानतळ डोंगरानं वेढलेलं आहे. त्यातच हवामान खराब असल्यामुळे लँडिंग करताना अडचणी आल्या, त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक अधिकारी गुरुदत्त ढकाल यांनी AFP ला सांगितलं की, विमानाच्या मलब्याला आग लागली असून बचावकार्य वेगात सुरु आहे. बचावपथकाचे जवान आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या दुर्घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसत आहे. बचाव कार्यात त्यामुळे अडथळे येत असल्याचं दिसत आहे.