गोव्यामध्ये 20-28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वोत्तम वेब सिरीज पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी आता प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया खुली करण्यात आली आहे.
पुरस्काराचे उद्दिष्ट
ओटीटीवरील समृद्ध आशय आणि त्याच्या निर्मात्यांच्या कामाची दखल घेणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. डिजिटल मंचांसाठी तयार केलेल्या आणि दाखवल्या जाणाऱ्या वेब सिरीजना प्रोत्साहन देऊन आणि त्यांचा गौरव करून भारतीय ओटीटी उद्योगात विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच प्रादेशिक भाषांमध्ये निर्मिती झालेल्या आशयासह वेब आशय उद्योगातील प्रादेशिक विविधता आणि सृजनशीलता यांना प्रोत्साहन देऊन भारतीय भाषांमधील ओटीटी आशयाला प्रोत्साहन देण्याचाही या पुरस्काराचा उद्देश आहे. भारतातील ओटीटी अवकाशात उपलब्ध झालेल्या संधींमुळे आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या असाधारण प्रतिभांचा शोध घेण्याचे आणि त्यांना सन्मानित करण्याचे काम हा पुरस्कार करेल. भारताच्या वाढत्या सृजनशील अर्थव्यवस्थेला अनुसरून, आशय निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी)च्या माध्यमातून आपल्या कामाचे प्रदर्शन करण्याची, ज्ञानाच्या देवाणघेवाणीची आणि आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्याची संधी देऊन, भारताच्या ओटीटी क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहन लाभ देणे हा देखील या पुरस्काराचा उद्देश आहे.