महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रमुख नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिलं जातं. कापसाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळण्याची आशा असते. कापसावर शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून असतं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यंदा कापसाला दहा ते चौदा हजारांच्या घरात प्रति क्विटंल भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीला कापसाचे दर नऊ हजारांपर्यंत पोहोचले होते. मात्र, काही दिवसानंतर कापसाच्या दरात घसरण सुरु झाली. मराठवाड्यातील कापसाची प्रमुख बाजार समिती समजल्या जाणाऱ्या मानवत बाजार समितीत कापसाचे दर स्थिरावले आहेत. कापसाच्या दरात होत असलेल्या चढ उतारामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दरवाढीची आशा कायम आहे.
शेतकऱ्याचं पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कापसाच्या भावामध्ये सातत्याने चढउतार होत आहेत. कापसाचे दर ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दरवाढीची अपेक्षा आहे. ९ जानेवारीला परभणीच्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला ८ हजार ६५० ते ८ हजार ७१५ भाव मिळाला होता. आठवड्याच्या सुरुवातीला आज कापसाला आज किमान ८ हजार ४०० ते ८ हजार ५२० इतका भाव मिळत आहे. कापसाचे दर स्थिरावल्यानं शेतकऱ्यांमध्ये दर वाढल्यानंतर विक्री करु, अशी भावना आहे.
परभणीच्या मानवतेतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९ जानेवारी रोजी कापसाला ८ हजार ६५० ते ८ हजार ७१५ भाव मिळाला होता. त्यानंतर ११ जानेवारी रोजी कापसाच्या भावामध्ये घसरून कापसाला ८ हजार ४५० ते ८ हजार ६१० रुपये भाव मिळाला होता. १२ जानेवारी रोजी पुन्हा एकदा कापसाच्या भावामध्ये घसरण झाली आणि कापसाला ८ हजार ५४०ते ८ हजार ५४० इतका भाव मिळाला. १६ जानेवारी रोजी देखील कापसाच्या भावामध्ये घसरण झाली असून कापसाला मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ८ हजार ४०० ते ८ हजार ५२० इतका भाव मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत आज कापसाचा क्विंटलचा दर ८ हजार २०० ते ८ हजार ७०० च्या दरम्यान राहिला.
९ जानेवारीपासून शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाच्या भावामध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. गतवर्षी ज्या कापसाला जवळपास १४ हजार रुपये भाव मिळाला होता तोच कापूस आता शेतकऱ्याला आठ ते साडेआठ हजार रुपये क्विंटल दराने विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर वाढल्यानंतर कापूस बाजारपेठेत विक्रीसाठी आण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं.