औरंगाबाद / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पिसादेवी येथे रविवारी (दि.८) जल्लोषात आगमन झाले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतासाठी पिसादेवी परिसरातील हजारो नागरिक व शिवभक्त यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या गगणभेदी घोषणा देत महाराजांचे स्वागत करण्यात आले.
पिसादेवी येथील जुन्या शिवस्मारकाच्या नुतनीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. पुतळ्याचे काम अंतिम झाल्यानंतर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये या पुतळ्याचे आज आगमन झाले. माजी आ. डॉ. कल्याण काळे, माजी जि. प. सभापती रघुनाथ काळे, कृ. उ. बा.समितीचे माजी सभापती जगन्नाथ काळे, सरपंच राजेश काळे, माजी सरपंच ताराचंद काळे, यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुढे गरवारे मैदान, ओखार्ड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयहिंद नगरी ते नियोजित शिवस्मारक दरम्यान भव्य मिरवणूक व वाहन रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान केलेले शिवभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यात लहान मुले, युवकांबरोबरच महिलांची संख्याही लक्षणीय होती. फुगड्यांचा फेर महिलांनी धरला. जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणांनी आसमंत निनादून सोडला होता. पिसादेवी परिसरात शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन होताच ठिकठिकाणी महिलांकडून शिवरायांचे औक्षण करून पुष्वृष्टी केल्याने सर्वांच्या उत्साहाला अजूनच उधाण आले होते. यावेळी बाबुराव काळे, पंढरीनाथ गोडसे, सुदर्शन काळे, अरूण काळे, शेख मदार, अनिल काळे, देविदास काळे, नंदू काळे , आंबादास पाडळे , संजय पके, मदन काळे, अशोक काळे, प्रभाकर जाधव, राजेश राठोड, संजय काकडे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
घरोघरी भगवे झेंडे, दारोदारी रांगोळ्या…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याचे आगमन होणार असल्याने सर्वांमध्येच उत्साह संचारला होता. सकाळपासूनच परिसरातील महिलांनी दारासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. प्रत्येक घरांवर भगवे झेंडे झळकत होते. दुचाकी, चारचाकींवर सुध्दा झेंडे लावण्यात आले होते. आपल्या घराजवळ शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन होताच प्रत्येक महिलांनी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत राजाला अभिवादन केले.