उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यभरात गेल्या महिनाभरात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे. कोकणा पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातही दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान महिनाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने दडी मारली आहे. पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.